Friday, July 9, 2010

९.७.१०


उत्‍तररात्री
हलक्‍या प्रहरी

निरव जाग येते...

भुतांची निघायची वेळ ही

हळुवार कुजबुज सुरु होईल त्‍यांची

...आपण डोळे बंद करुन घ्‍यावेत
म्‍हणजे कमी ऐकायला येईल आपल्‍याला.



विषण्‍णतेचा पहाटपसारा
गाज लाटांत गुडूप
क्षितीज काळेभोरे

मलूल शिड

सुस्‍तावलेला नांगर

-कप्‍तान टवटवीत

...उपयोग काय ?

Wednesday, July 7, 2010

९.३.१०

उन्‍मत्‍त हत्‍तींची

अवशिष्‍ट नगरीतील मुशाफिरी

अवचित

तरीही

सस्‍वागत;

हादरे, कंप, भयभीतता

उध्‍वस्‍तता...

- हवेच होते हे !

६.३.१०

जगण्‍यात सत्‍व नव्‍हते

मरणास मोल नाही

तरीही का खुणावे

आकाशाची निळाई


विद्ध सारी इंद्रिये

अन् सुन्‍न जाणिवाही

मात्र दूर समुद्राची

गाज निनादत राही

७.७.१०

काय भयानक आहे जुन्‍या डायऱ्या वाचणे !

भूतकाळाचा अख्‍खा पहाड कोसळला अंगावर;

कसा तरी निघालो बाहेर बचावून

धापा अजून चालूच आहेत.

Tuesday, January 5, 2010

५.१.१०
काहीतरी उफाणणारे, उसळणारे, पिळवटणारे
...थडगी उकरण्‍याचा परिणाम आणखी काय असतो ?
क्रुसाला तेवढे हलवू नको, ही सूचना ऐकणे थोडेच आपल्‍या हातात असते ?
सारी भळभळ मोकळी झाली की सारे कसे शांत..शांत !
स्‍मशानाहून शांत जागा नाहीच का दुसरी ?
थोड्या वेळाने चंद्र उगवेल.
स्‍मशानाच्‍या कुंपणावरुन हलकाच वर येईल.
क्रुसावर चांदणे बरसू लागेल.
मी मोर होईन.
अन् स्‍मशान- आषाढ.