Friday, October 9, 2009

९.१०.९, जसलोक १७ वा माळा

शहर कितीही गजबजलेलं असलं
तरी समुद्र शांतच असतो
...समुद्रच तो !

शहराच्‍या गच्‍च गर्दीचा थांग
समुद्राला नसतोच
...तो तर अथांग !

शहर
...घुसमटलेलं

समुद्र
...मोकळा श्‍वास !


समुद्र
चाच्‍यांचा,
मुंबईचे 26/11 करणाऱ्या दहशतवाद्यांचा;

...पण खरं म्‍हणजे
तो असतो
हेमिंग्‍वेच्‍या म्‍हाता-याचा,
मुक्‍त विहरणाऱ्या समुद्रपक्ष्‍यांचा,
आणि अख्‍ख्‍या समुद्रालाच कवेत घेणाऱ्या
निळ्या, अनंत आभाळाचा...!

Monday, June 29, 2009

२२.६.६, डलहौजी

डलहौजीतील

ही कातरवेळ.

तीही तशीच

काळीज कातरत जाणारी.


सूर्यास्‍तानंतर

सगळ्या सावल्‍या

संधिप्रकाशात

झरझर

विरत गेल्‍या.


त्‍याच

कोवळ्या

जीर्ण कळा

आसमंत

आवळत निघाल्‍या.


आता अंधार होईल

मीही अनोळखी होईन.


...मग तोच अनादी

कभिन्‍न तेजोत्‍सव

अंतर

आरपार

उजळून टाकील.


२२.६.६, डलहौजी

मृगजळं

ढगफुटीत वाहून गेली;

अन् मी खोल खाईत.


तेव्‍हापासून...

दिवेलागणीची वेळ

जमेल तेवढी लांबवत राहिलो.


जगणे हे ‘वास्‍तवात’च असते,

हे पटवण्‍याचा

अट्टाहास

तुम्‍ही का करत आहात ?