Monday, September 28, 2015

१४.०८.०७

चकव्यांनी भोवंडून जाणे
एक अपरिहार्यता
की
मस्ती - ठाऊक नाही

रात्री घरंगळत येतात
अडविणे अशक्यच;
वेचणेही सोपे नाही
मग नुसते पाहत राहावे मुकाट-
सांगणे अवघड

२६.०८.०७

मुंगीचा शाप
अखेर शाप असतो
वेलींचा गुंता
उगीच होत नसतो

ही आस
कातरवेळेची
दबलेले उसासे
क्षितीजभर होण्याची

दवबिंदूंची ही आस
अशी कशी
उन्हाची ऊब पांघरण्याची

Monday, July 7, 2014

तिच्या आठवणींची सोबत असायची;
...हल्ली तीही नाही.

Friday, July 9, 2010

९.७.१०


उत्‍तररात्री
हलक्‍या प्रहरी

निरव जाग येते...

भुतांची निघायची वेळ ही

हळुवार कुजबुज सुरु होईल त्‍यांची

...आपण डोळे बंद करुन घ्‍यावेत
म्‍हणजे कमी ऐकायला येईल आपल्‍याला.



विषण्‍णतेचा पहाटपसारा
गाज लाटांत गुडूप
क्षितीज काळेभोरे

मलूल शिड

सुस्‍तावलेला नांगर

-कप्‍तान टवटवीत

...उपयोग काय ?

Wednesday, July 7, 2010

९.३.१०

उन्‍मत्‍त हत्‍तींची

अवशिष्‍ट नगरीतील मुशाफिरी

अवचित

तरीही

सस्‍वागत;

हादरे, कंप, भयभीतता

उध्‍वस्‍तता...

- हवेच होते हे !

६.३.१०

जगण्‍यात सत्‍व नव्‍हते

मरणास मोल नाही

तरीही का खुणावे

आकाशाची निळाई


विद्ध सारी इंद्रिये

अन् सुन्‍न जाणिवाही

मात्र दूर समुद्राची

गाज निनादत राही

७.७.१०

काय भयानक आहे जुन्‍या डायऱ्या वाचणे !

भूतकाळाचा अख्‍खा पहाड कोसळला अंगावर;

कसा तरी निघालो बाहेर बचावून

धापा अजून चालूच आहेत.

Tuesday, January 5, 2010

५.१.१०
काहीतरी उफाणणारे, उसळणारे, पिळवटणारे
...थडगी उकरण्‍याचा परिणाम आणखी काय असतो ?
क्रुसाला तेवढे हलवू नको, ही सूचना ऐकणे थोडेच आपल्‍या हातात असते ?
सारी भळभळ मोकळी झाली की सारे कसे शांत..शांत !
स्‍मशानाहून शांत जागा नाहीच का दुसरी ?
थोड्या वेळाने चंद्र उगवेल.
स्‍मशानाच्‍या कुंपणावरुन हलकाच वर येईल.
क्रुसावर चांदणे बरसू लागेल.
मी मोर होईन.
अन् स्‍मशान- आषाढ.

Friday, October 9, 2009

९.१०.९, जसलोक १७ वा माळा

शहर कितीही गजबजलेलं असलं
तरी समुद्र शांतच असतो
...समुद्रच तो !

शहराच्‍या गच्‍च गर्दीचा थांग
समुद्राला नसतोच
...तो तर अथांग !

शहर
...घुसमटलेलं

समुद्र
...मोकळा श्‍वास !


समुद्र
चाच्‍यांचा,
मुंबईचे 26/11 करणाऱ्या दहशतवाद्यांचा;

...पण खरं म्‍हणजे
तो असतो
हेमिंग्‍वेच्‍या म्‍हाता-याचा,
मुक्‍त विहरणाऱ्या समुद्रपक्ष्‍यांचा,
आणि अख्‍ख्‍या समुद्रालाच कवेत घेणाऱ्या
निळ्या, अनंत आभाळाचा...!

Monday, June 29, 2009

२२.६.६, डलहौजी

डलहौजीतील

ही कातरवेळ.

तीही तशीच

काळीज कातरत जाणारी.


सूर्यास्‍तानंतर

सगळ्या सावल्‍या

संधिप्रकाशात

झरझर

विरत गेल्‍या.


त्‍याच

कोवळ्या

जीर्ण कळा

आसमंत

आवळत निघाल्‍या.


आता अंधार होईल

मीही अनोळखी होईन.


...मग तोच अनादी

कभिन्‍न तेजोत्‍सव

अंतर

आरपार

उजळून टाकील.


२२.६.६, डलहौजी

मृगजळं

ढगफुटीत वाहून गेली;

अन् मी खोल खाईत.


तेव्‍हापासून...

दिवेलागणीची वेळ

जमेल तेवढी लांबवत राहिलो.


जगणे हे ‘वास्‍तवात’च असते,

हे पटवण्‍याचा

अट्टाहास

तुम्‍ही का करत आहात ?