Friday, October 9, 2009

९.१०.९, जसलोक १७ वा माळा

शहर कितीही गजबजलेलं असलं
तरी समुद्र शांतच असतो
...समुद्रच तो !

शहराच्‍या गच्‍च गर्दीचा थांग
समुद्राला नसतोच
...तो तर अथांग !

शहर
...घुसमटलेलं

समुद्र
...मोकळा श्‍वास !


समुद्र
चाच्‍यांचा,
मुंबईचे 26/11 करणाऱ्या दहशतवाद्यांचा;

...पण खरं म्‍हणजे
तो असतो
हेमिंग्‍वेच्‍या म्‍हाता-याचा,
मुक्‍त विहरणाऱ्या समुद्रपक्ष्‍यांचा,
आणि अख्‍ख्‍या समुद्रालाच कवेत घेणाऱ्या
निळ्या, अनंत आभाळाचा...!