Friday, December 5, 2008


२.१२.८
सव्‍वीस नोव्‍हेंबरपासून सारेच सुन्‍न भिन्‍न.
आपल्‍या, मानवतेच्‍या अस्तित्‍वाची क्षणभंगुरता मानवच बहाल करणार का ?
इतक्‍या थंड काळजाने अतिरेक्‍यांनी हे क्रौर्य कसे काय पार पाडले ?
बुद्ध, ख्रिस्‍त, गांधी...अनेक महामानवांनी शांतता, करुणेचे मानवाला साकडे घातले ;
लोकशाही जीवन व शासनव्‍यवहार जगाने मान्‍य केला ;
तरीही याला आवर पडू नये !
उलट नव्‍या सैतानी तंत्रशैली उगवू लागल्‍या आहेत.

ते तीन दिवस स्‍फोट, गोळीबाराचे अखंड ध्‍वनी टीव्‍हीतून मेंदूत दणाणत होते.
पण जाणिवा सुन्‍न.
हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांचे कापरासारखे दिसता दिसता उडून जाणे-
अजूनही नाही पटत.

करकरे केव्‍हाही टीव्‍हीवर पत्रकारांशी बोलताना दिसतील असेच वाटते.

पहिली रात्र टक्‍क जागी. दुसरी, तिसरी अर्धवट गुंगीत. उडालेली झोप अजून पूर्ववत नाही.

परवा शहिदांना अभिवादनाची सभा झाली, मेणबत्‍त्‍या घेऊन फेरी निघाली.
त्‍यातील सहभागाने गदगदण्‍याला, कोंडलेपणाला काहीएक निचरा मिळाला.

पण पुढचे धुके अजून विरत नाही.
म्‍हणूनच सुन्‍नता अजूनही ठाण मांडून.
१२.५.८
रात्र चढत जाते
माळावर शुभ्र चांदणे
गडद होत जाते
प-ह्याचा खळखळाट
शांत कल्‍लोळ
शमवित नाही

सकाळ होणे आवश्‍यकच आहे का ?